वळण मार्गावर दोन दुचाक्या एकमेकांना आपटल्या; एका दुचाकीवरील तरुण जागीच ठार.. - दोन अल्पवयीन मुली व दोन तरुण जखमी..
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-एका दुचाकीवरील गडचिरोली शहरातील दोन अल्पवयीन मुली व दुसऱ्या दुचाकीवरील तिघे जण दुचाकीस्वार यांचा पोटेगाव वळण मार्गावर दोन्ही दुचाक्या एकमेकांना आपटल्याने अपघात होऊन एक तरुण जागीच ठार तर दोन अल्पवयीन मुली व दोन तरुण जखमी झाल्याची घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास घडली.अपघातात ३० वर्षीय राकेश प्रभाकर मुनघाटे रा.कुराडी,जि.गडचिरोली याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील १५ वर्षीय अनुष्का प्रमोद धाईत रा.कन्नमवार नगर,गडचिरोली व १५ वर्षीय अक्षरा सदानंद सुरणकर रा.इंदिरानगर गडचिरोली तसेच ३० वर्षीय दुर्योधन विलास चौधरी,४० वर्षीय छत्रपती विनायक चौधरी रा.कुराडी अशी जखमींची नावे आहेत.
गडचिरोली शहरातील अनुष्का व अक्षरा या ट्युशन क्लासनंतर शहरापासून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या पोटेगाव मार्गावरील जंगल परिसरात फोटो काढण्यासाठी गेल्या होत्या.फोटो काढून त्या गडचिरोलीकडे परत येत होत्या.तर राकेश हा दुचाकीने दुर्योधन व छत्रपती यांना सोबत घेऊन कुराडीवरून विहिरगावकडे जात होता.तितक्यातच दोन्ही दुचाक्या पोटेगाव वळण मार्गावर येताच समोरासमोर जोरदार धडकल्या.यात दोन्ही दुचाकीवरील पाच जण खाली कोसळले.अश्यातच वाहनचालक राकेश हा जागीच ठार झाला तर यातील अक्षराच्या तोंडाला मार लागला व अनुष्काच्या पायाला लागले आहे.मृत राकेश हा विहिरगाव येथील एका शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर चालवण्याचे काम करीत होता.घटनेच्या दिवशी शेताला कुंपण बनविण्याचे काम सुरू होते.त्यामुळे तिघेही कुराडीवरून विहिरगावकडे जात होते.अश्यातच राकेशला मृत्यूने कवटाळले.घटनेची माहिती गडचिरोली पोलीस प्रशासनास कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले.घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलीस प्रशासन करीत आहे.