गडचिरोलीच्या कोंढाळा गावात वाघाची एंट्री; अंगणात आढळून आले पगमार्क... - नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; बंदोबस्त करण्याची मागणी..
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(देसाईगंज) :-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावात वाघाने एंट्री केल्याची घटना आज,९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोंढाळा गावापासून आरमोरी-गडचिरोली मार्गे अवघ्या ३०० मीटर अंतरावर जंगल परिसर लागून आहे.जंगल परिसरात मागील गेल्या सहा ते सात वर्षांपासून हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढलेला दिसून येतो आहे.यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात कोंढाळा गावातील अभिमन झिलपे व लव्हा मेश्राम जागीच ठार झाले होते.तर एक इसम शेतावर जात असतांना वाघाशी दोन हात करून थोडक्यात बचावला होता.अशातच आता आज ९ ऑगस्टला बसस्थानक नजिक परिसरात वास्तव्यास असणारे सुनील धाकडे यांच्या घरासमोरील अंगणात वाघ वा वाघिणीचे पगमार्क आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.पगमार्क केवळ अंगणातच आढळून आले नाहीत तर मुख्य मार्गावरून लागूनच असलेल्या स्मशानभूमी परिसरातील बीएसएनएल टॉवर आणि नहराच्या चिखलात दिसून आले आहेत.सध्या स्थितीत कोंढाळा जंगल परिसरात वाघ,वाघीण व तिचे तीन पिल्ले असल्याची माहिती आहे.कदाचित वाघिणीचे पिल्ले भरकटल्याने पिल्ले व वाघीण गावशेजारी आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.अंदाज जरी वर्तविण्यात येत असला तरीही एखादा इसम त्यांच्या तावडीत सापडल्यास ठार झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे एखद्यावेळेस अनुचित घटना घडून नाहक कुणाचा बळी जाऊ नये; याकरीता वन विभागाने तात्काळ दखल घेऊन हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा; अशी मागणी कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत व ग्रामवासिय जनतेंनी केली आहे.