अन्य गुराख्यांसमोरच एका गुराख्याला वाघाने केले ठार...
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जनावरांना चारण्यासाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना काल,मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास सावली वनपरिक्षेत्रातील राजोली मरेगाव शेतशिवरात घडली.वासुदेव झिवरू पेंदोर वय ६० वर्षे,रा.मरेगाव असे गुराख्याचे नाव आहे.
मूल तालुक्यातील मरेगाव येथील वासुदेव पेंदोर आपल्या बैलांना चारण्यासाठी सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगाव येथील सर्व्हे नं.१११ मध्ये गेले होते.शेतशिवाराला लागून असलेल्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही अंतरावरच असलेल्या अन्य गुराख्यांसमोरच ही घटना घडल्याने त्यांनी गावात जाऊन ही माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.सावली वनविभागातर्फे मृताच्या कुटुंबियांना २५ हजाराची तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली.आतापर्यंत तीन ते चार गुराखी शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.मात्र, वनविभाग हल्ले रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहे.